नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर नंबर दोन कोण आहेत, असा सवाल करीत काँग्रेसने गुरुवारी सरकारला धारेवर धरले. मोदी गेल्या पाच दिवसांपासून विदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या अनुपस्थितीत कोण प्रभारी असेल, याबाबत अनिश्चितता असल्यामुळे काँग्रेसचे नेते के. व्ही. थॉमस यांनी हा सवाल केला.लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, सरकारमध्ये नंबर दोन कुणीच का नाही? हे सामूहिक नेतृत्व आहे काय? संपुआ सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे आपल्या अनुपस्थितीत सर्वात ज्येष्ठ मंत्र्याकडे कार्यभार देत असत. मोदींच्या सरकारमध्ये काही तरी चूक घडत आहे, असेही थॉमस म्हणाले. मोदी सरकारमध्ये नंबर दोन कोण यावर चर्चा झडत असताना थॉमस यांनी नेमका हा मुद्दा उपस्थित केला. अरुण जेटली यांना मोदींचे खास निकटस्थ मानले जात असून तेच सूत्रधार मानले जातात. राजनाथसिंग यांनी पंतप्रधानांनंतरचे आसन काबीज करीत नंबर दोन भासवले आहे. मोदी विदेशात असून मंगळवारी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांच्या अनुपस्थितीत कुणीही अध्यक्षपद स्वीकारले नाही. त्यामुळे सरकारमध्ये नंबर दोन कोण याचे संकेत मिळत नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदी यांच्यानंतर नंबर दोन कोण?
By admin | Published: July 18, 2014 1:42 AM