मोदींच्या 'त्या' वक्तव्यानंतर किरेन रिजिजूंनी शेअर केला शुर्पणखेचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 01:40 PM2018-02-08T13:40:38+5:302018-02-08T15:20:08+5:30
पंतप्रधान मोदींनी आज सभागृहात पुन्हा एकदा 'रामायण' मालिकेची आठवण करून दिली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत रेणुका चौधरी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी 'रामायण' मालिकेतील शुर्पणखेचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला होता. यामध्ये शुर्पणखा जोरजोरात हसताना दिसत आहे. त्यानंतर लक्ष्मण तिचे नाक कापतो, असेही व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ शेअर करत रिजिजू यांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदींनी आज सभागृहात पुन्हा एकदा 'रामायण' मालिकेची आठवण करून दिली. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमधील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. रेणुका चौधरी यांनीदेखील या व्हिडीओवर आक्षेप घेतला असून आपण याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे रेणुका चौधरी यांनी सांगितले.
This is highly objectionable, and I am going to file for privilege: Renuka Chowdhury, Congress on Kiren Rijiju posting a video of PM Modi's remarks on Renuka Chowdhury in Rajya Sabha yesterday. pic.twitter.com/9d7gEL0IqC
— ANI (@ANI) February 8, 2018
Congress says it's a breach of privilege! Rajya Sabha Chairman remarked that such behaviour is unbecoming. I'm only referring to how PM didn't get annoyed. https://t.co/9TMMGatnIo
— Kiren Rijiju (@KirenRijiju) February 8, 2018
निवडणुकीच्या मैदानात विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कौशल्याबद्दल कोणालाच शंका नाही. मात्र, मोदींनी बुधवारी राज्यसभेत आपल्या हजरजबाबी वृत्तीने काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पंतप्रधान मोदी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेत बोलत होते. यावेळी मोदींच्या एका विधानावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी जोरजोरात हसायला लागल्या. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत रेणुका चौधरी यांना कारवाई करण्याचा इशारा दिला.
मात्र, मोदींनी यावेळी कमलीचा हजरजबाबीपणा दाखवत रेणुका चौधरी यांना सणसणीत टोला लगावला. त्यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना रेणुका चौधरी यांना काही म्हणून नका, असे म्हटले. कारण रामायण मालिका संपल्यानंतर आज पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं, असे सांगत मोदींनी चौधरींच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली. यानंतर सभागृहात मोठा हशा पिकला. रेणुका चौधरी यांनी काही म्हणण्याचा प्रयत्न केला पण सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाल्यानंतर त्यांना शांत बसावे लागले.
दुसरीकडे मोदींनी रेणुका चौधरी यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी असे वक्तव्य करून स्त्रियांचा अपमान केला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर रेणुका चौधरी यांनी मोदी यांनी त्यांचे संस्कार दाखवून दिल्याचे म्हटले. मी पंतप्रधानांइतक्या खालच्या पातळीला जाऊ इच्छित नाही. मात्र, यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांची मानसिकता दिसून आल्याचे रेणुका चौधरी यांनी सांगितले होते.