नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत रेणुका चौधरी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी 'रामायण' मालिकेतील शुर्पणखेचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला होता. यामध्ये शुर्पणखा जोरजोरात हसताना दिसत आहे. त्यानंतर लक्ष्मण तिचे नाक कापतो, असेही व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ शेअर करत रिजिजू यांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदींनी आज सभागृहात पुन्हा एकदा 'रामायण' मालिकेची आठवण करून दिली. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमधील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. रेणुका चौधरी यांनीदेखील या व्हिडीओवर आक्षेप घेतला असून आपण याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे रेणुका चौधरी यांनी सांगितले.
मात्र, मोदींनी यावेळी कमलीचा हजरजबाबीपणा दाखवत रेणुका चौधरी यांना सणसणीत टोला लगावला. त्यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना रेणुका चौधरी यांना काही म्हणून नका, असे म्हटले. कारण रामायण मालिका संपल्यानंतर आज पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं, असे सांगत मोदींनी चौधरींच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली. यानंतर सभागृहात मोठा हशा पिकला. रेणुका चौधरी यांनी काही म्हणण्याचा प्रयत्न केला पण सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाल्यानंतर त्यांना शांत बसावे लागले.
दुसरीकडे मोदींनी रेणुका चौधरी यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी असे वक्तव्य करून स्त्रियांचा अपमान केला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर रेणुका चौधरी यांनी मोदी यांनी त्यांचे संस्कार दाखवून दिल्याचे म्हटले. मी पंतप्रधानांइतक्या खालच्या पातळीला जाऊ इच्छित नाही. मात्र, यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांची मानसिकता दिसून आल्याचे रेणुका चौधरी यांनी सांगितले होते.