अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी यांची 'चाय पे चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 10:01 PM2024-08-09T22:01:58+5:302024-08-09T22:03:10+5:30
दिल्लीत संसदेचं अधिवेशन कामकाज संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनौपचारिक चर्चा पार पडली. यावेळी खेळीमेळीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
नवी दिल्ली - संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर शुक्रवारी अनौपचारिक चहा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकमेकांना अभिवादन केले. यावेळी राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना युक्रेनमधील स्थितीबाबत विचारलं, त्यावर भारत रशिया यूक्रेन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं.
अनौपचारिक बैठकीत सत्ताधारी-विरोधक एकत्र
अनौपचारिक बैठकीचे फोटो समोर आलेत, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अमित शाह, राजनाथ सिंह, राहुल गांधी, किरण रिजिजू, पीयूष गोयल आणि चिराग पासवान बसलेले दिसतात. शुक्रवारी लोकसभेचं बजेट अधिवेशन संपलं. मागील २२ जुलैपासून सुरू असलेले हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार होते. परंतु शुक्रवारीच अधिवेशनाचा सूप वाजलं. १८ व्या लोकसभेच्या या अधिवेशनात सदनात अनेक विधेयके, खासगी विधेयके मांडण्यात आली.
लोकसभा अधिवेशनाचा तपशील देताना अध्यक्ष ओम बिर्लांनी सांगितले की, या संपूर्ण अधिवेशनात सभागृहाच्या १५ बैठका झाल्या, ११५ तासांचे कामकाज चालले. २३ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात केंद्रीय बजेट २०२४-२५ सादर केले. सभागृहात केंद्रीय बजेटवर २७ तास १९ मिनिटे चर्चा झाली त्यात १८१ खासदारांनी सहभाग घेतला. ज्याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी ३० जुलैला दिले. अधिवेशन काळात एकूण १३४५ पत्र सभागृहाच्या पटलावर ठेवली.
#ParliamentSession ||
— All India Radio News (@airnewsalerts) August 9, 2024
Prime Minister Narendra Modi, Defence Minister Raj Nath Singh, Minister of Home Affairs and Cooperation Amit Shah, Minister of Parliamentary Affairs and Minority Affairs Kiren Rijiju, Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi, and Leaders of Political… pic.twitter.com/QtGGLxe9LG
अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींवर आरोप
लोकसभेच्या शून्य प्रहरात भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर आरोप केले. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत ते सभागृहात काहीच बोलले नाही. जेव्हा बांगलादेशात अंतरिम सरकारनं कार्यभार हाती घेतला. तेव्हा पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. परंतु त्याचसोबत अल्पसंख्याकांवरील होणारे हल्ले रोखण्याचं आवाहन केले असं अनुराग ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांचे चहाच्या बैठकीतले फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.