नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडॉऊनमुळे देशाच्या अनेक भागांत लोक जिथल्या तिथेच अडकून पडले होते. सरकारने जारी केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा 3 मेपर्यंत वाढवला. यामुळे या मजुरांची चिंता आणि भीती वाढली आहे. या काळात हाताला कामही नाही. यामुळे यांच्यावर उपासमारीचीही वेळ आली आहे. परिणामी हे मजूर आता आपल्या घराकडे जाण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरू लागले आहेत. असाच प्रकार मुंबईतील वांद्रा रेल्वेस्टेशननंतर आज (बुधवारी) दिल्लीतही बघायला मिळाला. येथे हजारोंच्या संख्येने मजुरांनी यमुना नदीच्या काठावर गर्दी केली होती.
मुंबई पाठोपाठ आता दिल्लीतही सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजताना दिसत आहेत. येथेही हजारोंच्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले आहेत. येथील यमुना नदीच्या काठावर हे सर्व मजूर एकत्र आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या मजुरांना फळे देऊन दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे मजूर आपापल्या राज्यात जाण्यासाठी जमले आहेत, की आणखी काही कारणाने एकत्र आले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, येथे सोशल डिस्टंसिंगचे पार तीन-तेरा वाजताना दिसत आहे.
दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1118 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11933 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 392 वर गेला आहे. तसेच 1344 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी गेले आहेत.