पुणे - मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी देणारे हे केवळ नरेंद्र मोदी होते, त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील तेव्हा मी देखील राजकारण सोडेन, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले.‘वर्डस काउंट’ या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. उद्योजक अतुल चोरडिया, सागर चोरडिया, महोत्सवाच्या आयोजक वर्षा चोरडिया, सबिना संघवी आणि ‘वडर््स काउंट’ या संकल्पनेच्याप्रणेत्या अद्वैता कला हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी ‘स्क्रिप्टिंग हर स्टोरी-फ्रॉम स्टार टू स्टार कॅम्पेनर’ या विषयावर अद्वैता कला यांनी स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली. यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या की, आमचे सरकार हे विकासाच्या मुद्द्यावर तर संघटन हे राजकारणावर सुरू असून एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला राजकारण करावेच लागते. मात्र, विकासाचा मुद्दा हा आमच्या सरकारसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला असता तो ठरविण्याचा अधिकार हा जनतेला आहे. आज विविध माध्यमांचा सर्वत्र प्रभाव आहे. मात्र काही दशकांपूर्वी जेव्हा हा प्रभाव नव्हता, तेव्हा सुमित्रा महाजन आणि सुषमा स्वराज यांसारख्या महिला नेत्यांनी आपला राजकारणातील प्रवास सुरू केला होता. तो काल आजच्या काळापेक्षा नक्कीच कठीण होत, त्यामुळे या दोघीही माझ्यासाठी प्रेरणा आहेत, असेही इराणी यांनी यावेळी नमूद केले.अमेठीतून लढणार का?यंदादेखील अमेठीमधून निवडणूक लढवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, की २०१४ मध्ये कोण स्मृती इराणी हा प्रश्न अनेकांनी केला. मात्र, आता २०१९ मध्ये सगळ्यांना ‘स्मृती इराणी कोण आहेत’ हे माहिती आहे. परंतु मी अमेठीतून निवडणूक लढविणार की नाही, याचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा हेच घेतील.
नरेंद्र मोदींच्या निवृत्तीनंतर मीही राजकारण सोडेन - स्मृती इराणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:25 AM