बंगळुरू : तब्बल अडीच वर्षांनंतर देशांतील उत्पादन क्षेत्रात वाढ झाली असून, जानेवारी महिन्यामध्ये उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक ५५.३ वर गेला असल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे. मंदीच्या सावटात असलेल्या अर्थ व उद्योग क्षेत्रासाठी ही आनंदाची बाब मानली जात आहे. खरेदी व विक्रीमध्ये वाढ होऊ लागल्याचे हे निदर्शक मानले जात आहे.
औद्योगिक क्षेत्रातील ही वाढ आठ वर्षांतील सर्वाधिक असल्याचे एका खासगी सर्वेक्षणातून आढळले आहे. मॅन्युकॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्समध्ये वाढ दिसून आली आहे, असे यात म्हटले आहे. फेब्रुवारी २0१२ नंतर हा सर्वाधिक निर्देशांक आहे. त्याआधीचे ३0 महिने म्हणजेच अडीच वर्षे हा निर्देशांक ५0 च्या खाली होता.
डिसेंबर महिन्यात हा निर्देशांक ५२.७ इतका होता. या निर्देशांकामध्ये वाढ झाली याचाच अर्थ देशांतर्गत उत्पादनात वाढ झाली आहे. वस्तुला मागणी असते, ती विकली जात असते, तेव्हाच उत्पादनात आणि पर्यायाने रोजगारात वाढ होत असते. म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये कंपन्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसत आहे. गेले आठ महिने उत्पादन क्षेत्र अतिशय अडचणीत होते.
मागणी वाढली की उत्पादन वाढते, रोजगार वाढतो. त्यामुळे डिसेंबर व जानेवारी हे महिने उद्योजक व कामगार यांच्यासाठी लाभदायी ठरले आहेत, असे आयएचएस मर्किटचे मुख्य अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी सांगितले. आशिया, युरोप तसेच उत्तर अमेरिकेतील मागणी वाढल्यामुळे प्रामुख्याने उत्पादनात वाढ झाली असली तरी त्याचा फायदा भारतीय कंपन्यांनाच झाला.
ग्राहकोपयोगी वस्तुंच्या मागणीमध्ये प्रचंड नाही, तरी समाधानकारक वाढ झाल्याचे सर्वेक्षण सांगते. उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक ५0 वा त्याहून अधिक असतो, तेव्हा उत्पादनात वाढ झाली, असे मानले जाते. त्याहून तो कमी असतो, तेव्हा उत्पादन, पर्यायाने मागणी कमी होत आहे, असा अर्थ लावला जातो. त्याचा थेट परिणाम रोजगारावर होत असतो. (वृत्तसंस्था)