ठाणे, दि. 23 - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांची अखेर नऊ वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. कारागृहात जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बुधवारी सकाळी पुरोहित तळाजोतुरुंगाबाहेर आले. सुटकेच्यावेळी पुरोहितांसोबत त्याचे कुटुंबिय आणि लष्कराचे जवान देखील होते. त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून, मुंबईत एऩआयए कोर्टात काही आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर ते पुण्याला रवाना होतील अशी प्राथमिक माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वीच सोमवारी कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. पण काही तांत्रिक प्रक्रियांमुळे त्यांच्या सुटकेला दोन दिवस लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास पथक) न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळी उशिरा मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या सुटकेचा आदेश दिला होता.
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता. पुरोहित यांच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने मात्र जामिनाला विरोध केला होता. पुरोहित यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा असे एनआयएचे म्हणणे होते. न्यायाच्या दृष्टीकोनातून पुरोहित यांना जामिन मंजूर केला पाहिजे असा युक्तीवाद हरीश साळवे यांनी केला होता. मालेगाव प्रकरणात आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरला जामिन मिळतो मग पुरोहितला का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. एनआयएची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप साळवे यांनी केला होता. साक्षीदारांच्या साक्षीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात झालेल्या या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहित यांचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती. एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मकोका हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते.केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
आदेशात बदल केल्याने लगेच सुटणे शक्य झालेले. कर्नल पुरोहित यांच्या वकिलाने सोमवारी न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या मूळ आदेशात मंगळवारी सकाळी तातडीने बदल करून घेतल्याने या आरोपीची तुरुंगातून लवकर सुटका होणे सुलभ झाले. कर्नल पुरोहित यांचा एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व तेवढ्याच रकमेचे दोन जामीन, अशा अटीवर सुटकेचा मूळ आदेश झाला होता.अॅड. नीला गोखले यांनी पुन्हा त्याच खंडपीठाकडे जाऊन या आदेशात बदल करून घेतला. त्यानुसार दोन जामिनांच्या ऐवजी प्रत्येकी एक लाखाचे दोन रोख जामीन, असा बदल केला गेला. परिणामी जामिनांची रोख रक्कम भरून कर्नल पुरोहित लगेच बाहेर येऊ शकले. रोख जामिनांच्या बदल्यात रीतसर जामीन देण्याची कायदेशीर प्रक्रिया पुढील १५ दिवसांत पूर्ण केली जाईल.