म्हैसूर: मांड्यातील डोड्डेनहल्ली गावात वास्तव्यास असलेल्या नंजुंडे गौडा आणि ममता यांच्या घरात ९ वर्षांनी पाळणा हलणार होता. त्यामुळे ते दोघेही आनंदात होते. बाळाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. कोरोनाचं संकट घरापर्यंत पोहोचू नये यासाठी नंजुंडे आणि ममता शक्य तितकी सगळी काळजी घेत होते. ११ मे रोजी ममता यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र मुलीच्या जन्माआधीच कुटुंबावर मोठं संकट कोसळलं. मुलीच्या जन्मानंतरही संकटांची मालिका सुरुच राहिली.ममता यांनी ११ मे रोजी एका मुलीला जन्म दिला. मात्र त्यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब दु:खात होतं. ४५ वर्षीय नंजुंडे गौडा यांचा ३० एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर बंगळुरूत उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ममता यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर चारच दिवसांत त्यांचीही प्राणज्योत मालवली. ममता यांना कोरोनाची लागण होताच त्यांच्यावर मांड्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. इथेच त्यांनी ११ मे रोजी एका गोंडस कन्येला जन्म दिला. मात्र यानंतर त्यांची प्रकृती खालावली. १५ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ममता यांचं पार्थिव डोड्डेनहल्ली इथे आणण्यात आलं. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ममता यांचा विवाह ९ वर्षांपूर्वी झाला होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. मात्र बरीच वर्षे त्यांना मूल नव्हतं. त्यासाठी ममता आणि नंजुंडे यांनी विविध उपचार केले. अखेर ममता गर्भवती राहिल्यानं दोघेही खूश होते. ममता यांच्या भावंडांनी तिच्या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेच तिचा सांभाळ करणार आहेत. यासोबतच स्थानिक तहसीलदारांनी मुलीच्या संगोपनासाठी १० हजार रुपयांची मदत केली आहे.
CoronaVirus News: हृदयद्रावक! ९ वर्षांनी घरी पाळणा हलला; पण अवघ्या १५ दिवसांत आई-वडिलांचा कोरोनानं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 5:00 PM