नवी दिल्ली - नितीशकुमार यांनी दुसऱ्यांदा भाजपाशी काडीमोड घेतला. त्यानंतर राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत राजकीय भूकंप घडवला. सत्तेच्या सारिपाटावर राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीसोबत नव्याने डाव मांडल्यानंतर पुन्हा राज्यापलांची भेट घऊन महाआघाडी सरकार स्थापन करण्याचा दावाही केला. नितीशकुमार यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड झाली. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी यावरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बिहारमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पी चिदंबरम यांनी खोचक टोला लगावला आहे. "भाजपा जेव्हा इतर पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते त्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी असतं" असं म्हणत टीका केली आहे. तसेच "भाजपा कधीही कोणत्याही राज्यातील लोकांचा विश्वासघात करत नाही. पक्षांतरांसाठी प्रोत्साहन देणं हा पक्षांतर करणाऱ्यांच्या विकासाठी कल्याणकारी उपाय आहे. इतर राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणे हे त्यांचं शुद्धीकरण करण्याचा प्रकार आहे. राज्य सरकारांना अस्थिर करणं, त्या राज्यांमध्ये स्थिरता आणण्यासाठी आहे" असं म्हटलं आहे.
पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात कारवाई कऱणं हा संसदेने संमत केलेल्या कायद्यांच्या परिणामकारकतेची चाचणी करण्याचा भाग आहे, जेणेकरुन कायदे अजून कडक करता येतील. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे चीन, रशिया, तुर्कस्तान, व्हिएतनाम आणि उत्तर कोरिया यांसारख्या एकपक्षीय शासनाच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करण्याचं उद्दिष्ट आहे" असं देखील चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे १६४ आमदारांची यादी सादर केली. विधानसभेतील प्रभावी संख्याबळ २४२ असून बहुमताचा जादुई आकडा १२२ आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून बुधवारी दुपारी दोन वाजता शपथ घेतील. नितीशकुमार यांनी आज उचललेले पाऊल २०१७ च्या अगदी उलट आहे. त्यावेळी महाआघाडी सोडून एनडीएत सामील झाले होते. त्यांनी नऊ वर्षांत दुसऱ्यांदा भाजपची साथ सोडली आहे.