कोची : सौर पॅनेल घोटाळ्याबाबत दक्षता न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती देत केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुख्यमंत्री ओमन चांडी, ऊर्जामंत्री ए. मोहम्मद यांच्यासह काँग्रेसच्या नेतृत्वातील युडीएफ सरकारला मोठा दिलासा दिला आहे. चुकीचा आदेश दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारल्यानंतर विशेष दक्षता न्यायाधीश एस.एस. वासन यांनी स्वेच्छानिवृत्तीला परवानगी मागितल्यामुळे या वादाला वेगळे वळण मिळाले.न्या. वासन यांनी गुरुवारी चांडी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर राजकीय वर्तुळ हादरले होते. शुक्रवारी मात्र उच्च न्यायालयाने केवळ न्या. वासन यांच्या आदेशाला स्थगितीच दिली नाही तर प्रशासकीय विभागाला त्यांच्यावर कोणती कारवाई करायचीयाबाबत विचार करायला सांगितले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासातच न्या. वासन यांनी स्वेच्छानिवृत्तीची परवानगी मागितली आहे. कायद्यासमोर सर्व जण समान आहेत. मग एखादा गावकरी असो की मुख्यमंत्री असे न्या. वासन यांनी आदेशात म्हटले होते.चौकशी आयोग आणि थ्रिस्सूरच्या विशेष न्यायाधीशांनी (दक्षता)आपल्या अधिकारांचे स्वरूप विचारात न घेताच एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिल्याचे उच्च न्यायालयातील न्या. पी. उबेद यांनी स्पष्ट केले. चांडी आणि मोहम्मद यांनी उच्च न्यायालयात धाव घेत दक्षता न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला आव्हान दिले. दक्षता न्यायालयाचा आदेश दोन महिन्यांसाठी स्थगित ठेवतानाच न्या. उबेद यांनी या न्यायालयाने संबंधित आदेश देताना चूक केल्याचे रोखठोकपणे सुनावले. दक्षता आयोगाने केवळ वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे एफआयआर दाखल करण्याचा आदेश देताना मोठी चूक केली आहे, असा युक्तिवाद चांडी यांनी याचिकेत केला होता. (वृत्तसंस्था)
ताशेऱ्यानंतर दक्षता न्यायाधीशांनी मागितली स्वेच्छानिवृत्ती
By admin | Published: January 30, 2016 12:02 AM