लोकसभेमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र शपथ घेताना ओवेसींनी जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आता भाजपाच्याही एका खासदाराने घेतलेल्या शपथेवरून वाद सुरू झाला आहे. भाजपाचे उत्तर प्रदेशमधील बरेली येथील खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या एका घोषणेमुळे गोंधळाला सुरुवात झाली. छत्रपाल सिंह गंगवार यांनी शपथेवेळी जय हिंदूराष्ट्र, जय भारत अशी घोषणा दिली होती.
छत्रपाल सिंह गंगवार यांनी शपथेची सुरुवात करताना जय हिंदू राष्ट्र जय भारत अशी घोषणा दिली. त्यांनी दिलेल्या घोषणेनंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी आरडा ओरडा करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ही घोषणा घटनाविरोधा असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. मात्र या गोंधळादरम्यानच भाजपा खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनी आपली शपथ पूर्ण केली.
तत्पूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेल्या घोषणेमुळे लोकसभेत वाद झाला होता. ओवेसी यांनी बिस्मिल्लाह वाचून खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर जाता जाता जय भीम, जय तेलंगाणा आणि जय पॅलेस्टाईन, अशी घोषणा दिली. त्यानंतर भाजपाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती.