लखनौ - महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधूंची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनेतशी संवाद साधला. त्यामध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनेची संपूर्ण माहिती दिली, तसेच आरोपींना अटक केल्याचेही सांगितले. पालघरची ही घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशातीलबुलंदशहर येथे दोन साधुंची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा हे हत्याकांड घडलं आहे. या घटनेनं तेथील ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात शिवमंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधू जगनदास (५५ वर्षे) आणि सेवादास (३५वर्षे) राहात आहेत. हे दोन्ही साधू मंदिरात राहून पूजा-अर्चना आणि भक्तीत लीन असतात. सोमवारी रात्री या दोन्ही साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी लोकं मंदिराकडे गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही साधूंचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात मंदिर आवारातच पडल्याचे दिसून आले. या घटनेने ग्रामीण भागातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ते मंदिराकडे आले आहेत.
या घटनेबाबत ग्रामस्थांनीच पोलिसांनी माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनेमागचं कारण अस्पष्ट आहे. यासंदर्भात सीओ अतुल चोबे यांनी घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगतिलंय. तसेच, ग्रामस्थांन एका युवकावर संशय व्यक्त केला असून पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील पालघर येथेही दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती.