Priyanka Gandhi Corona Positive: सोनिया गांधींनंतर प्रियांका गांधींना कोरोनाची लागण; नवसंकल्प शिबिरात झाल्या होत्या सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 11:34 AM2022-06-03T11:34:37+5:302022-06-03T11:35:32+5:30
Priyanka Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची लाट नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, आता देशभरातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा एकदा देश निर्बंधांकडे जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. खुद्द प्रियांका गांधी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. सर्व प्रोटोकॉल पाळत मी स्वतःला घरी क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी विनंती करणारे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
नवसंकल्प शिबिरात सहभाग
महासचिव पदाची जबाबदारी असलेल्या प्रियांका गांधी या लखनऊ येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात सहभागी झाल्या होत्या. लखनऊ येथून दिल्लीला आल्यानंतर प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दुसरीकडे, सोनिया गांधी यांना कोरोनाच लागण झाल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. सोनिया गांधी गेल्या काही दिवसांत ज्या नेत्यांना भेटल्या होत्या त्यातील काही नेते देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. सुरजेवाला यांना दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना गुरुवारी सौम्य स्वरुपाचा ताप आला. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोनामधून लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे. तसेच सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं चौकशीसाठीची नोटीस धाडली आहे. येत्या ८ जून रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पण आता सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं चौकशीसाठी त्या उपस्थित राहणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.