विमानातील बिघाडानंतर मोदींचा राहुल गांधींना फोन, तब्येतीची केली विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 11:07 AM2018-04-27T11:07:27+5:302018-04-27T11:36:01+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी दिल्लीहून हुबळी येथे जाताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडाला काँग्रेसनं वेगळं वळण देत कोणीतरी राहुल गांधींविरोधात कट रचल्याचं म्हणत कर्नाटक पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
बंगळुरू- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी दिल्लीहून हुबळी येथे जाताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडाला काँग्रेसनं वेगळं वळण देत कोणीतरी राहुल गांधींविरोधात कट रचल्याचं म्हणत कर्नाटक पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. परंतु या विमानात बिघाड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
विमानाच्या बिघाडामागे घातपाताचाही संशय व्यक्त करत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्या तरी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमान बिघाडाची राहुल गांधींशी फोनवरून चर्चा करून माहिती घेतली. नवी दिल्लीहून कर्नाटकातल्या हुबळी येथे जाणा-या राहुल गांधींचं 10 सीटर दसॉल्ट फॉक्न 2000 एअरक्राफ्ट लँडिंगच्या दरम्यान रनवेवर उतरवण्यात आलं आहे. विमानात राहुल गांधींच्या शेजारील बसलेल्या कौशलनं आरोप केला की, विमान अचानक झुकलं जाऊन धक्के जाणवले.
कर्नाटकातल्या आयजीकडे दिलेल्या तक्रारीत कौशलनं म्हटलं आहे की, हवामान स्वच्छ आणि सामान्य होतं. अशात विमानानं असे झटके देणं योग्य नाही. यात्रेदरम्यान अस्पष्ट स्वरूपात काही तांत्रिक बिघाड झाला. प्रवासादरम्यान 10.45च्या सुमारास विमान अचानक एका बाजूला झुकले आणि खाली आले. त्याच वेळी विचित्र आवाजही झाला. कर्नाटकातले काँग्रेस महासचिव शाकिर सनादी यांनीसुद्धा या प्रकरणात वैमानिकाला जबाबदार ठरवत एफआयआर दाखल केले.