Naveen Patnaik: २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी हळूहळू तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच आता ओडिसाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे विरोधकांची एकजूट करण्याच्या स्वप्नाला धक्का लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष तेजस्वी यादव मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी बोलताना, भाजप देशविरोधी काम करत असून त्याच्याविरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्रित आल्यास लोकशाही वाचेल. इतरही विरोधी पक्षांच्या आम्ही भेटी घेऊ, असे म्हटले होते. मात्र, नवीन पटनायक यांनी स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे.
PM मोदींच्या भेटीनंतर नवीन पटनायकांचा स्वबळाचा नारा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची दिल्लीत भेट झाली. ही शिष्टाचार भेट असल्याचे नवीन पटनायक यांनी सांगितले. आम्ही जे मुद्दे मांडले आहे, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती नवीन पटनायक यांनी दिली. तसेच बीजू जनता दल २०२४ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. आधीपासूनच त्यांची तशी योजना होती, असे पटनायक यांनी स्पष्ट केले. याशिवाय अन्य कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या भेटीची योजना नसल्याचे पटनायक यांनी सांगितले.
दरम्यान, २००८ मध्ये नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल पक्ष एनडीएमधून बाहेर पडला होता. अलीकडेच नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांची भेट झाली होती. या भेटीनंतर कोणत्याही युतीबाबतच्या चर्चा पटनायक फेटाळल्या होत्या. आमची मैत्री जगजाहीर आहे. आम्ही एकत्र काम केले आहे. मात्र कोणत्याही आघाडी अथवा युतीबाबत चर्चा झालेली नाही, असे पटनायक यांनी स्पष्ट केले होते.