नवी दिल्ली - कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केले की, रविवारी संध्याकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी सर्वांनी घरी दिवे लावावे. मोदींच्या या आवाहनावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस खासदार चिदंबरम यांनी रविवारी आपण दिवे लावण्यास तयार असल्याचे म्हटले. तसेच तुम्हाला अर्थतज्ज्ञांचे ऐकावे लागेल, अस आवाहनही मोदींना केले.
पी. चिंदबरम यांनी ट्विट केले की, आम्ही तुमचं ऐकणार असून ५ एप्रिल रोजी दिवे लावणार आहोत. मात्र त्या बदल्यात तुम्ही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे ऐकावे. तुम्ही आज गरीबांसाठी पॅकेजची घोषणा कराल, अशी आम्हाला आशा होती. ज्याचा विसर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पडला होता. चिदंबरम पुढे म्हणाले की, काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदतीची गरज आहे. भलेही तो उद्योग क्षेत्रातील असो वा मजूर. आता आर्थिक शक्तीला रिस्टार्ट करण्याची आवश्यकता आहे. तसे संकेत देऊन त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज चिदंबरम यांनी व्यक्त केली.
पी. चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसनेते शशी थरूर यांनीही मोदींवर निशाना साधला. आज पुन्हा एकदा प्रधान ‘शोमॅन’चे भाषण ऐकले. लोकांचे दु:ख आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही. तसेच भविष्याची काय योजना आहे. लॉकडाऊननंतर काय, यावर मोदी काहीही बोलले नाही. मोदींनी केवळ सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण केल्याची टीका थरूर यांनी केली.
कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल,'' असे आवाहन मोदींनी केले आहे.