सीमा हैदर आणि सचिनच्या PUBG वरील प्रेमकथेनंतर आता फ्री फायर गेम खेळताना प्रेमात पडण्याची गोष्ट समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये फ्री फायर गेम खेळत असताना एक २१ वर्षीय तरुणी बिहारमधील सुजीत नावाच्या मुलाच्या संपर्कात आली. दोघे बोलू लागले आणि प्रेमात पडले. सोमवारी दोघेही पळून गेले. नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
गोरखपूरच्या पीपीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गावात राहणारी २१ वर्षीय तरुणी अचानक घरातून बेपत्ता झाली. त्यानंतर दोन दिवस कुटुंबीय तिचा शोध घेत होते. दरम्यान, मुलगी प्रियकरासह पळून गेल्याचे नातेवाईकांना समजले. याबाबत कुटुंबीयांनी पीपीगंज पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
पाकिस्तानच्या सीमा हैदर आणि नोएडाच्या सचिनची प्रेमकहाणी PUBG गेम खेळताना सुरू झाली, ज्यामध्ये सीमा तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आणि नोएडाला पोहोचली. सीमा आणि सचिनप्रमाणेच गोरखपूरमधील मुलगी आणि बिहारमधील एका मुलाची गोष्ट फ्री फायर या गेमपासून सुरू झाली. फ्री फायर खेळत असताना 21 वर्षीय तरुणी पाटणा येथील सुजीतच्या प्रेमात पडली.
दोघांचे प्रेम इतके वाढले की 31 जुलै रोजी दोघेही घरातून पळून गेले. मुलगी अभ्यासाच्या बहाण्याने मोबाईलवर गेम खेळायची, असे मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आम्हाला वाटलं ती अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणी फारसे लक्ष दिले नाही. ती रात्रभर अभ्यास करण्याऐवजी गेम खेळत होती हे आम्हाला काय माहीत? असंही म्हटलं.
पीपीगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी आशिष सिंह सांगतात की, मुलीच्या कुटुंबीयांकडून तक्रार करण्यात आली आहे. यावरून दोघांचा शोध सुरू आहे. सध्या दोघांचे लोकेशन बिहारची राजधानी पाटणा येथे सापडले आहे. मुलगा पाटण्यात ऑटो चालवतो. दोघांनाही गोरखपूरला आणण्याची तयारी सुरू आहे. प्रकरण अन्य राज्याचे असल्याने परवानगी मागितली आहे. मुलगी प्रौढ असून तिचे वय २१ वर्षे असल्याने दोघांची चौकशी केल्यानंतरच संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.