नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पाकपुरस्कृत पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवरच्या कारवाईसाठी मोदींवर दबाव वाढत आहे. इस्रायल, अमेरिका, रशियासारख्या देशांनीही भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून, भारतानं निर्णायक कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पाकिस्ताननंही युद्धाची तयारी सुरू केली आहे. भारतानं जर युद्धाचा मार्ग पत्करलाच तर पाकिस्तानही भारताला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. तसेच जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत भारताच्या दबावात येऊ नका, असं सांगितलं असून यानंतरच पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.पाकिस्ताननं सर्व लष्करी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराने जिलानी रुग्णालयाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्यास सांगण्यात आलं आहे. राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे.लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले असून, सामान्य रुग्णालयांमध्ये जवानांसाठी 25 टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आलं आहे’. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर लॉन्चपॅडवरील सर्व दहशतवाद्यांना तिथून हटवलं आहे. पीओके सरकारने लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेजवळ जाऊ नये, रात्रीच्या वेळी गरज नसल्यास विजेचे दिवे लावू नका, असे निर्देश पाकिस्तान सरकारनं पीओकेमधील लोकांना दिले आहेत. युद्धाच्या परिस्थितीत क्वेट्टा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सामान्य आणि लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांना दाखल केलं जाऊ शकतं. प्राथमिक उपचारानंतर या सैनिकांना बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याची योजना आहे,’ असं HQLA चे फोर्स कमांडर एशिया नाज यांनी जिलानी रुग्णालयाच्या अब्दुल मलिक यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. पाकिस्ताननं सियालकोट बॉर्डरजवळ स्वतःचे टँक पाठवले आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानानं पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक गावांना रिकामी केलं आहे, तसेच इतर लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरील लोकांचं ये-जा करणं थांबवलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या 127 गावांना हाय अलर्ट जारी केला आहे. LoCजवळच्या 40 गावांना रिकामी केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरलं आहे. भारतीय शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत भारतानं पाकिस्तानला दिले आहेत.
पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी, रुग्णालय अन् लष्कराला सज्जतेचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:28 PM