तिरुवनंतरपुरम - एकीकडे पंजाब काँग्रेसमधील कलह थांबण्याचे नाव घेत नाही आहे, तर दुसरीकडे राजस्थान काँग्रेसमध्ये सध्या वादळाआधीची शांतता आहे. (Congress Politics News) त्यात आता अजून एका राज्यात पक्षातील नेत्यांमध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर केरळ काँग्रेसमध्ये संघर्ष वाढला असून, अंतर्गत कलहाला कंटाळून पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.व्ही. गोपिनाथन यांनी राजीनामा दिली आहे. गोपिनाथन हे पलक्कड जिल्ह्यातील माजी आमदार आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत. (After Punjab and Rajasthan, in Kerala too, there was a quarrel in the Congress, a big leader resigned)
केरळमध्ये १४ जिल्ह्यांत नवे पक्षाध्यक्ष निवडण्यावरून हा वाद सुरू झाला होता. यादरम्यान, गोपिनाथन यांनी साोमवारी सांगितले की, मला आता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या पक्षात अजून थांबणे मला औचित्याचे वाटत नाही. ते म्हणाले गेल्या 50 वर्षांपासून मी पक्षाचे काम करत आहे. मात्र आता मी आशा सोडली आहे. आता काँग्रेसमध्ये राहण्याचे काही कारणच उरलेले नाही. मात्र सध्यातरी आपण दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही सत्ताधारी सीपीएमचे नेते ए.के. बालन यांनी सांगितले की, आता निर्णय गोपिनाथन यांच्या हातात आहे. बालन यांचे हे विधान गोपिनाथन यांना सत्ताधारी पक्षाकडून आलेली ऑफर म्हणून पाहिले जात आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार गोपिनाथन यांनाच जिल्हाध्यक्ष नियुक्त करावे, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला होता. मात्र पक्षनेतृत्वाने ए. थंकप्पन यांची निवड केली. तत्पूर्वी गोपिनाथन हे विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट न मिळाल्याने नाराज झाले होते. मात्र त्यांना पक्षात पद देण्याचे आश्वासन दिले गेले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाने दोन वरिष्ठ नेते शिवदासन नायर आणि एपी अनिल कुमार यांना निलंबत केल्यानंतर एका दिवसानंतर गोपिनाथन यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.