वॉशिंग्टन/नवी दिल्ली : राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या न्यायालयीन खटल्यावर अमेरिका लक्ष ठेवून आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाही तत्त्वे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही भारतासोबत काम करत राहू, अशी प्रतिक्रिया सोमवारी एका पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या राज्य विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी दिली.
काँग्रेसने राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याविरोधात पुढील ३० दिवस देशभरात ‘सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने अमेरिकेला फटकारले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या न्यायालयीन खटल्याकडे लक्ष देत असल्याची अमेरिकन अधिकाऱ्याची टिप्पणी फेटाळत काँग्रेस नेत्याला लोकसभेतून अपात्र ठरवणे ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे म्हटले. ही आमची अंतर्गत बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वर कोणीही नाही. त्यांनी (अमेरिकेने) सर्वसाधारण वक्तव्य केले आहे.