- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : रॉ संघटनेच्या प्रमुखपदी रवी सिन्हा या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदी सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), बीएसएफ, सीआरपीएफ, एनआयएमधील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. काही यंत्रणांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात आली.
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत असलेल्या सहा अधिकाऱ्यांना विशेष संचालकपदी बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये एहसान रिझवी, राहुल रासगोत्र, विवेक श्रीवास्तव, टी. व्ही. रविचंद्रन, राजीव वर्मा, हरिनाथ मिश्रा या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
सीमा सुरक्षा दलात अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत असलेल्या पी. व्ही. पार्थसारथी, वाय. बी. खुरानिया या दोन अधिकाऱ्यांना विशेष महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले. सीआरपीएफमधील विद्यमान दोन अतिरिक्त महासंचालकांची विशेष महासंचालकपदी नेमणूक झाली.
एनआयए विशेष महासंचालकपदी कुलकर्णीकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) विशेष महासंचालकपदावर नीना सिंह तर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष महासंचालकपदी ए. एम. कुलकर्णी यांची नेमणूक झाली आहे. कुलकर्णी यांचा या पदावरील कार्यकाळ ३१ जानेवारी २०२३ पर्यंत असणार आहे. ते महाराष्ट्र केडरचे १९९०च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.