मैनपुरी: उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी जिल्ह्यात पुनर्जन्माचा प्रकार समोर आला आहे. औंछा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नगला सलेहीत वास्तव्यात असलेल्या प्रमोद कुमार यांच्या घरी एक ८ वर्षांचा मुलगा आला. तो त्यांना थेट बाबा बाबा म्हणून हाक मारू लागला. हा प्रकार पाहून प्रमोद कुमार चक्रावले. मात्र त्या मुलानं त्याच्या सोबत गेल्या जन्मी घडलेला प्रकार सांगताच प्रमोद यांनी त्याला मिठी मारली. अंघोळ करत असताना कालव्यात बुडून माझा मृत्यू झाला होता, ही गोष्ट लहान मुलानं प्रमोद यांना सांगितली. ती ऐकताच प्रमोद कुमार यांना अश्रू अनावर झाले.
प्रमोद कुमार यांचा मुलगा रोहितचा २०१३ मध्ये कालव्यात बुडून मृत्यू झाला. त्यावेळी त्याचं वय १३ वर्षे होतं. रोहित सलेहीतल्या माध्यमिक शाळेत शिकायचा. रोहितच्या पुनर्जन्माची कहाणी ऐकून ग्रामस्थ थक्क झाले. कारण प्रमोद यांच्या घरी आलेल्या ८ वर्षीय मुलानं सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. रामनरेश नावाची एक व्यक्ती या मुलाला घेऊ प्रमोद कुमार यांच्या घरी पोहोचली. आठ वर्षांपूर्वी त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला. त्याचं नाव चंद्रवीर ठेवण्यात आलं. तो बोलू लागला, तेव्हापासून पुनर्जन्माबद्दलच्या गोष्टी सांगू लागल्याचं रामनरेश म्हणाले.
नगला सलेही गावात असलेल्या आई-बाबांना भेटण्याचा आग्रह चंद्रवीर वारंवार करायचा. मात्र मुलाला गमावयाचं नसल्यानं रामनरेश त्याला नगला सलेहीला घेऊन जात नव्हते. मात्र शेवटी मुलाच्या हट्टापुढे त्यांनी हात टेकले. चंद्रवीर यानं प्रमोद कुमार यांना पुनर्जन्माची संपूर्ण हकिकत सांगितली. ती ऐकण्यासाठी संपूर्ण गाव लोटला होता. त्याचवेळी तिथे नगला सलेही गावातील शाळेचे मुख्याध्यापक आले. त्यांना चंद्रवीरनं नावानं हाक मारली आणि त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर मुख्याध्यापक उलट तपासणी म्हणून चंद्रवीरला शाळेत घेऊन गेले. त्यावेळी रोहित शिकत असलेल्या वर्गातील अनेक गोष्टी त्यांना अगदी स्पष्ट आणि तंतोतंत सांगितल्या. चंद्रवीरच्या भेटीमुळे रोहितचे आई वडील आनंदित झाले. ग्रामस्थ अजूनही हा सगळा प्रकार ऐकून हैराण आहेत.