ऑनलाइन लोकमत
लखीमपुर खीरी, दि. 4- तब्बल तीस वर्ष लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहलेल्या आजी- आजोबांनी नुकतंच लग्न केलं आहे. उत्तर प्रदेशातील नोखेलाल मौर्य या 76 वर्षीय आजोबांनी रामदेवी या 70 वर्षीय आजींबरोबर विवाहगाठ बांधली आहे. मिठौली कस्बेमध्ये सोमवारी संध्याकाळी हा विवाह सोहळा पार पडला. हिंदू पद्धतीने या दोघांनी लग्न केलं. मौर्य हे शेती करतात. त्या दोघांना चार मुली आहेत. सोमवारी संध्याकाळी रामदेवी नववधुप्रमाणे पोशाख करून आपल्या मुली आणि नातवंडासह तेथिल स्थानिक दुर्गा मंदिरात पोहचल्या तर दुसरीकडे नोखेलाल मौर्य हेसुद्धा नववराप्रमाणे पोशाखकरून त्यांच्या मित्रांसमवेत मंदिरात पोहचले होते. गावातील पुजाऱ्याने या दोघांचं लग्न हिंदूपद्धतीनुसार लावून दिलं.
गावकऱ्यांच्या सांगण्यानूसार, नोखेलाल 1984 साली रमादेवी यांना सीतापुर या त्यांच्या गावातून घेऊन आले होते. तेव्हापासूनच ते दोघं लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. याचदरम्यान त्यांना चार मुली झाल्या. त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला. या आजी-आजोबांना एकुण 10 नातवंडंसुद्धा आहेत. तीस वर्षांपेक्षा जास्त वेळ लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर नोखे लाल यांचं कुटुंब त्यांच्यावर लग्नासाठी दबाव वाढवत होते. कुटुंबाकडून वाढत्या दबाबामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सोमवारी लग्न केलं.
आम्ही दोघांनी लग्न करावं आणि आमच्या नात्याला सामाजिक मान्यता मिळावी ही आमची इच्छा होती. म्हणून आम्ही लग्न केलं, असं नोखे लाल यांनी सांगितलं.