नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांत दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या असून, आपचे नेते एचएस फुलका यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एक दिवस उलटत नाही तोच दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फुलका आणि माकन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आप आणि काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य आघाडीच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठीच्या युतीच्या बोलणीला वेग येण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपमध्ये होणाऱ्या संभाव्य युतीच्या मार्गात आप नेते एचएस फुलका आणि काँग्रेसचे दिल्ली अध्यक्ष अजय माकन यांच्याकडून अडथळे येत होते. दरम्यान, या दोघांच्याही राजीनाम्यामुळे दिल्लीच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होण्याची शक्यता आहे.1984 साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलीमुळे फुलका हे आप आणि काँग्रेसमधील आघाडीला विरोध करत होते. तर आपण आपशी संघर्ष केला आहे. त्यामुळे आपण आपसोबत आघाडी कशी काय करू शकतो, असा प्रश्न माकन यांच्याकडून उपस्थित करण्यात येत होता. मात्र या दोन्ही नेत्यांनी राजीनामे दिल्याने आप आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता दोन्ही पक्षांमध्ये आघाडीच्या चर्चेला सुरुवात होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपकडून संजय सिंह तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या चर्चा करत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांत आघाडी करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी शीला दीक्षित, जे.पी. आग्रवाल आणी योगानंद शास्त्री यांची नावे चर्चेत आहेत.
माकन, फुल्का यांचे राजीनाम्यांमुळे काँग्रेस-आप आघाडीच्या मार्गातील अडथळे दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 3:31 PM
फुलका आणि माकन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आप आणि काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य आघाडीच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत
ठळक मुद्देएचएस फुलका आणि अजय माकन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आप आणि काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य आघाडीच्या मार्गातील अडथळे दूरकाँग्रेस आणि आपमध्ये आघाडीच्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आगामी लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांत आघाडी करून निवडणूक लढवण्याची शक्यता