नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच, ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे. तर, शिंदे तो झाँकी है, पायलट और देवरा अभी बाकी आहे, असे मेसेजही पाहायला मिळत आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली आहे. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असंही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले आहेत.
शिंदेच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस समर्थकही नाराजी झाल्याचं दिसून येतयं. तर, भाजपा समर्थक आणि काँग्रेसच्याही काही तरुण वर्गाकडून आता पुढील नेता सचिन पायलट असे म्हटले जात आहे. अनेकांनी, सचिन पालयट यांच्यासह महाराष्ट्रातील माजी खासदार मिलिंद देवरा यांचेही नाव घेतले आहे. सचिन पायलट आणि मिलिंद देवरा यांनीही ज्योतिरादित्य शिंदेच्या पावलावर पाऊल टाकले पाहिजे, असेही म्हटले जात आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भाजपानं संध्याकाळी सीईसीची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत ज्योतिरादित्य शिंदेसुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी माजी खासदार आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपाचे समर्थन केले होते. भाजपाच्या काही धोरणात्मक निर्णयाला जाहीरपणे पाठिंबा देत, मोदींचे कौतुकही केले होते. तर, काँग्रेस नेते संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्या कलगीतुरा पाहायला मिळाला होता.