रांची - चारा घोटाळ प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या संपूर्ण प्रकरणात कारस्थान रचून आपल्याला अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे. लालूंनी मार्टिन लूथर किंग, नेल्सन मंडेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगातील महान नेत्यांबरोबर स्वत:ची तुलना केली. मार्टिन लूथर किंग, नेल्सन मंडेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रयत्नात अपयशी ठरले असते तर इतिहासाने त्यांना खलनायक ठरवले असते. आजही पक्षपाती, वर्णभेद आणि जातीय मानसिकतेच्या लोकांसाठी ते खलनायकच आहेत असे टि्वट लालू यादव यांनी केले.
हा निकाल म्हणजे माझ्या विरोधातील पक्षपाती प्रचाराचा भाग आहे. आपला सत्यावर पूर्ण विश्वास आहे असे टि्वटमध्ये लालू यादव यांनी म्हटले आहे. शक्तीशाली लोक आणि शक्तीशाली वर्ग नेहमीच समाजामध्ये दुही निर्माण करतात. जेव्हा कोणी छोटया वर्गातला माणूस त्या विरोधात आवाज उठवतो तेव्हा त्याला शिक्षा दिली जाते असे लालूंनी एक टि्वटमध्ये म्हटले आहे. लालू तुमच्या मार्गातला मोठा अडसर आहे पण सहजासहजी तुम्ही त्याला पराभूत करु शकत नाही. या धर्मयुद्धात लालू एकटा नसून संपूर्ण बिहार लालूंसोबत आहे हे लक्षात ठेवा असे लालूंनी म्हटले आहे.
तीन जानेवारीला लालूंना सुनावणार शिक्षा चारा घोटाळयाच्या प्रलंबित असलेल्या चार खटल्यांपैकी एका प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले. येत्या तीन जानेवारीला त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होईल. खच्चून भरलेल्या कोर्टरुममध्ये विशेष सीबीआय न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल सुनावला.
22 आरोपींपैकी सात जणांची निर्दोष सुटका करत लालूंसह 15 जणांना दोषी ठरवले. 1994 ते 1996 दरम्यान देवगड जिल्ह्याच्या कोषागारातून 84.5 लाख रुपये काढून घोटाळा केल्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. निकाल आल्यानंतर लगेचच पोलिसांनी लालूंसह सर्व आरोपींना ताब्यात घेतले. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांसह अन्य सात आरोपींची निर्दोष मुक्ततता केली.
निकाल येण्याआधी लालुंनी देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला होता. आम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेचा आदर करतो, आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही भाजपाची कारस्थाने यशस्वी होऊ देणार नाही. 2 जी घोटाळा, अशोक चव्हाणांच्या बाबतीत दिलासा देणारा जो निकाल आला तसेच माझ्या बाबतीत घडेल असे लालू म्हणाले. चारा घोटाळयात लालू यांच्या विरोधात एकूण पाच खटले दाखल असून त्यातील तीन प्रकरणे अजून प्रलंबित आहेत.