शीलेश शर्मा, नवी दिल्लीवेदप्रताप वैदिक आणि हाफिज सईद यांच्या भेटीच्या मुद्यावरून गुरुवारी पुन्हा लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत सष्टीकरण दिल्यानंतर प्रकरण थंड झाले आहे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतल्यानंतर ते पुन्हा भडकण्याचे संकेत मिळत आहेत. वास्तविकत: भाजपातील एका गटाला या प्रकरणात कारवाई हवी आहे. रालोआचा घटकपक्ष शिवसेनादेखील कडक भूमिका घेत कारवाईसाठी दबाब निर्माण करीत आहे. दुसरीकडे काँग्रेसदेखील हा मुद्दा सहजासहजी सोडायला तयार नाही. लोकसभेत काँग्रेसच्या गदारोळामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना दबावाखाली निवेदन सादर करावे लागले. पाकिस्तानातील भारताच्या उच्चायुक्तांचा अहवाल मिळाला आहे. त्यात उच्चायुक्तालयाला वैदिक आणि सईद यांच्या भेटीची कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. त्यामुळे उच्चायुक्तांनी वैदिक यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्वराज म्हणाल्या. सुषमा स्वराज यांनी वैदिक यांचा दौरा आणि सईद याच्या भेटीच्या मुद्यांवरून सरकारला अलिप्त केले असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वैदिक यांची भेट देशहिताची असल्याची टिपणी केली होती. या टिपणीने वाद चिघळविण्याचे काम केले आहे.
मोदी परतल्यानंतर वैदिक प्रकरण तापणार
By admin | Published: July 18, 2014 1:31 AM