बरेली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी होणं एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. तीन तलाक कायद्याच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीमध्ये एक महिला सहभागी झाली होती. रॅली संपल्यानंतर घरी पोचताच महिलेला तिच्या नवऱ्याने तीनदा तलाक हा शब्द उच्चारून घटस्फोट दिला.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. किला नावाच्या गावातील इंग्लिश गंज येथे राहणाऱ्या सायराने ही तक्रार केली आहे. सायराने केंद्रीय मंत्री मुख़्तार अब्बास नकवी यांची बहिण फरहत नकवी यांच्यासोबत हक फाउंडेशन नावाच्या संघटनेच्या वतीने ही रॅली काढली होती. यात त्यांनी मोदी यांना धन्यवाद देतानाच तीन तलाकबाबत कठोर कायदा करण्याची मागणी केली होती. तसेच गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांना मुस्लिम महिलांनी मते द्यावीत, असे आवाहन केले होते. सायराचा नवरा दानिश खान याला ही गोष्ट आवडली नाही. त्यामुळे त्याने तिला मारहाण करून तलाक दिला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
तीन तलाकवर बंदी घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार कायदा आणणार आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ सायराने मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी रॅली काढली होती. याचा राग आलेल्या पतीने आधी तर घरी येताच तिला जबर मारहाण केली आणि तीनदा तलाक म्हणून एक वर्षाच्या मुलासोबत घराबाहेर काढले. न्याय मागण्यासाठी ही महिला पोलिस ठाण्यात गेली तेव्हा त्यांनी तिला दाद दिली नाही. त्यामुळे तिने वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली आहे.