नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचे इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने समर्थन केले आहे. रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यानंतर आता पॉर्न स्टार मिया खलिफानेही पाठिंबा दिला आहे.
मिया खलिफाने आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ टि्वट केले आहे. तिने आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ महिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मोदी सरकारने मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 'कोणत्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे? त्यांनी दिल्लीत इंटरनेट सेवा खंडीत केली?', असे ट्विट करत मिया खलिफाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ महिलांचा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोंमधील पोस्टरवर लिहिले आहे की, 'शेतकऱ्यांची हत्या करणे बंद करा.'
याआधी रिहानानेही शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचे लक्ष वेधले आहे. आपण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत का नाहीत?, असा सवाल तिने ट्विटद्वारे केला आहे. तर ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ग्रेटाने ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत, असे ग्रेटाने ट्विट केले आहे.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटर प्रज्ञान ओझासह अनेक व्यक्तींनी रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांना उत्तर दिले आहे. प्रज्ञान ओझाने लिहिले आहे की, 'आपला देश शेतकऱ्यांबाबत गर्व करतो. आणि शेतकरी किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, लवकरच त्यांच्या शंकांच निरसन होईल. मात्र, आम्हाला दुसऱ्यांच्या प्रश्नांत पाय घालणाऱ्यांची गरज नाही. हा आमचा खासगी प्रश्न आहे.'