मुंबई : राज्यात महायुतीचे जागावाटप झाले नसतानाच मंगळवारी रिपाइंने चेंबूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मानखुर्द मतदारसंघदेखील रिपाइंला देण्यात यावा, अशी मागणी आता रिपाइं कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी रिपाइंकडून तयारीदेखील सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाबाबत वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी किमान दोन आकडी जागा रिपाइंला मिळाव्यात, अशी मागणी सेना-भाजपाकडे केली. मात्र सेना-भाजपाच्याच जागांचा तिढा कायम असल्याने सध्या तरी घटक पक्षांना किती जागा मिळणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, तिढा सुटत नसल्याचे पाहून मंगळवारी चेंबूरमधून दीपक निकाळजे यांनी रिपाइंमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र चेंबूरसोबतच मानखुर्दचीही जागा रिपाइंला मिळावी, अशी मागणी काही रिपाइं कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. युती झाल्यापासून मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघाची जागा ही सेनेच्या पारड्यात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात काँग्रेस आणि सपाची सत्ता आहे. २००९ च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून अबू आझमी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँगे्रसचे उमेदवार युसूफ इब्राहिम यांचा पराभव करत या जागेवर विजय मिळवला. मात्र सपा आणि काँगे्रसची सत्ता असताना या ठिकाणी काहीच सुधारणा न झाल्याचा आरोप काही स्थानिक करत आहेत. आजही मानखुर्द आणि शिवाजी नगरात मोठ्या समस्या येथील रहिवाशांना भेडसावत असून यामध्ये पाण्याची समस्या ही सर्वात मोठी असल्याचे रहिवाशांनी सांगितले. सात वेळा या मतदारसंघातून बाहेरचाच उमेदवार निवडून येत आहे. त्यामुळे या उमेदवाराला येथील स्थानिक समस्यांबाबत काहीच माहिती नसते. त्यामुळे यावेळी ही जागा रिपाइंला दिल्यास येथून स्थानिक रहिवाशाला तिकीट देण्यात येईल, अशी माहितीदेखील एका कार्यकर्त्याने दिली. यासाठी दोन जणांची नावेदेखील निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रिपाइंची चेंबूरनंतर मानखुर्द मतदारसंघावरही नजर
By admin | Published: September 25, 2014 1:44 AM