गाझीपूर – उत्तर प्रदेशच्या गाझीपूर इथं मुलाच्या हत्येच्या शोकात वडिलांनीही स्मशानभूमीत जीव सोडला. एकाच कुटुंबातील २ जणांच्या मृत्यूनं कुटुंबाला धक्का बसला. १८ ऑक्टोबरला कोतवाली परिसरात एका आरोपीने घरात घुसून हत्या केली होती. त्यानंतर युवकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंब आणि नातेवाईक स्मशानभूमीत पोहचले. त्याठिकाणी वडिलांनीही अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली इथं राहणाऱ्या जय मंगल राजभर यांचा मुलगा संजय राजभर याची हत्या करण्यात आली होती. संजय राजभरच्या वडिलांनी आरोपी तेजूविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत तेजूने घरात घुसून संजयची हत्या केली अशी तक्रार नोंदवली. संजयचे पार्थिव शरीर गाझीपूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले होते. ज्याठिकाणी संजयच्या मृतदेहाचे अखेरचे दर्शन घेताना वडील जयमंगल राजभर हे बेशुद्ध होऊन खाली कोसळले.
संजयच्या वडिलांना तात्काळ मंडिकल कॉलेज हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. परंतु रात्री उशीरा डॉक्टरांनी जयमंगल राजभर यांना मृत घोषित केले. बाप-लेकाच्या मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला तर गावात शोककळा पसरली. एसपी ओमवीर सिंह म्हणाले की, १७ ऑक्टोबरला संध्याकाळी कोतवाली परिसरात भरत मनावन रामलीला मंचच्या मेळ्यात काही अल्पवयीन मुलांमध्ये हाणमारीची घटना घडली होती. यावेळी प्रद्युम्न बिंद यांचा मुलगा तेजू जखमी झाला होता. तेजू बिंदने संजय राजभरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
त्यानंतर १८ ऑक्टोबरला तेजू आणि काही लोकांनी बदला घेण्यासाठी संजयच्या घरी पोहचले. तिथे संजयला मारहाण आणि शिविगाळ करण्यात आली. त्यानंतर तेजूने संजयच्या घरात घुसून त्याच्या डोक्यावर वार केला. त्यावेळी संजयचा आवाज ऐकून घरातले धावत आले. त्यामुळे तेजू पसार झाला. संजय राजभरला घरच्यांनी रुग्णालयात नेले. तिथे उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तेजू त्याच्या कुटुंबासह फरार झाला आहे. पोलीस तेजूचा शोध घेत आहेत. संजयचा मृतदेह पाहून त्याच्या वडिलांना धक्का बसला. त्यात त्यांनीही जीव सोडला. या घटनेमुळे गावात शांतता पसरली आहे. घटनास्थळी काही अघटित घडू नये यासाठी पोलिसांनीही बंदोबस्त लावला आहे.