मुंबई- एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर तब्बल सात तास 250 प्रवाशांचा खोळंबा झाला होता. शनिवारी हा प्रकार घडला आहे. एअरपोर्टवर प्रवाशांना एअरालाइन्सकडून जेवण व इतर सोयी न दिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, विमानाने तब्बल सात तासाच्या विलंबानंतर उड्डाण केल्याची माहिती मिळते आहे.
मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रात्री दीड वाजताच्या सुमारास विमान होतं. याच विमानाला उड्डाण करायला तब्बल सात तासांचा विलंब झाला. विमान उशिरा असल्याची माहिती प्रवाशांना शेवटच्या मिनिटाला देण्यात आली. संतापलेल्या प्रवाशांनी एअरपोर्टच्या एक्झिट गेट 47 जवळ आंदोलन केलं.
एअर इंडियाचं AI031 हे विमान मुंबई विमानतळावरून मध्यरात्री १.३५ वाजता अहमदाबादसाठी उड्डाण करणार होतं. पण, पायलट उपलब्ध नसल्याने ते सकाळी उड्डाण करेल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यावर संतप्त प्रवाशांनी एअर इंडियाविरोधात आंदोलन केलं. काही प्रवाशांनी विमानतळावरच धरणं आंदोलन केलं. यामुळे एअरपोर्टवर काही तास गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, एअर इंडियाच्या या कारभारामुळे प्रवाशांना रात्र एअर पोर्टवर जागून काढावी लागली.