लखनौ : कथुआ येथे आठ वर्षांच्या बालिकेवर झालेला सामुहिक बलात्कार व हत्या यामुळे संतापाची लाट उसळली असली तरी बलात्काराचे सत्र थांबण्यास तयार नाही. उत्तर प्रदेशातील इटा येथे सोमवारी एका विवाह सोहळ्यास पालकांसह गेलेल्या सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकोणीस वर्षांच्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीचे नाव सोनू आहे. इटा शहरातील विवाह सोहळ््यात पालक दंग असल्याचे पाहून, सात वर्षांच्या बालिकेला घेऊन सोनू जवळच्याच बांधकाम सुरू असलेल्या घरात गेला. तिथे त्याने या बालिकेवर बलात्कार केला. आपले बिंग फुटू नये, म्हणून त्याने तिची हत्या केली. मुलगी बेपत्ता झाल्याने पालकांनी शोध सुरू केला तेव्हा तिच्या मृतदेह त्यांना त्या घरात आढळला. सोनूच्या वडिलांचा लग्नासाठी मंडप बांधण्याचा व्यवसाय आहे. (वृत्तसंस्था)बलात्कारांत वाढ : भारतात पंधरा मिनिटाला एका अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार होतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणात २०१५ पेक्षा २०१६मध्ये ८२ टक्के वाढ झाली. अत्याचार होण्याचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात आहे. देशातील एकूण गुन्ह्यांपैकी १५ टक्के गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये घडतात. गुजरातमधील सुरतमध्येही ११ दिवसांपूर्वी एका बालिकेचा मृतदेह मिळाला होता. तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. अद्याप तिची ओळख पटलेली नाही.
उत्तर प्रदेशमध्ये सात वर्षांच्या बालिकेची बलात्कारानंतर हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:37 PM