मुंबई, दि. 21 - पुरूषाच्या शरीरामध्ये एक महिला अडकलेली होती, तर महिलेच्या शरीरामध्ये होता एक पुरूष. लिंगबदलासाठी तीन वर्षांपूर्वी दोघे मुंबईत आले असताना एकमेकांना भेटले आणि या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेमानं पुढची पायरी गाठली असून पुढील महिन्यात दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. थोडक्यात, महिला झालेला पुरुष व पुरुष झालेली महिला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.आरव अपुकुट्टन (वय 46) याचा जन्म महिला म्हणून झाला व तिचं नाव होतं बिंदू. सुकन्या कृष्णन (वय 22) या आताच्या मुलीचा जन्म पुरूष म्हणून झाला नी त्याचं नाव होतं चंदू. मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये लिंगबदलासाठी दोघे आले आणि तिथंच त्यांची गाठ पडल्याचं वृत्त मिड डे नं दिलं आहे. लिंगबदलाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आरव व सुकन्या सप्टेंबरमध्ये लग्न करणार आहेत.सुकन्यानं एक आठवण सांगितली, "मी एका नातेवाईकाशी फोनवर मल्याळीमध्ये बोलत होते. माझं बोलणं संपल्यावर लक्षात आलं की माझ्या बाजुला आरव फोनवर कुणाशीतरी मल्याळीत बोलत होता. त्याचा फोन झाल्यावर तो माझ्याकडे आला आणि त्याने तू केरळमधून आलीस का विचारलं. तिथून आमचं बोलणं सुरू झालं." डॉक्टरांच्या अपॉइंटमेटसाठी तीन तासाचा वेळ लागला या हा वेळ दोघांना एकमेकांना जाणून घ्यायला पुरेसा ठरला. त्यानंतर फोन नंबरची अदलाबदल झाली आणि दोघांच्या गप्पा वरचेवर व्हायला लागल्या. आरव केरळला परत गेला तर सुकन्या नोकरीनिमित्त बेंगळूरला गेली. नंतर दोघांनी शस्त्रक्रिया आणि एकूण ट्रीटमेंटबद्दल एकमेकांशी सविस्तर चर्चा केली. हळूहळू दोघांमधला संवाद वाढायला लागला, नंतर नंतर तर आम्ही रोजच एकमेकांशी फोनवर बोलायला लागलो, सुकन्यानं सांगितलं. एकच भाषा आणि एकाच अनुभवातून दोघेही गेलेले असल्यामुळे दोघांची पटकन मैत्री झाली, जिचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. काही महिन्यांनंतर दोघे पुन्हा मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये भेटले. आता आम्ही मंदिरामध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे आरवने सांगितले. दोन्ही कुटुंबांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले असून मूल दत्तक घेणार असल्याचा विचारही दोघांनी व्यक्त केला.लहानपणापासूनच मी पुरुष असल्याचं वाटत असल्याचं आरव (आधीची बिंदू) सांगतो. तेरा वर्षांचा असताना माझी खात्री झाली की मी मुलगी नाहीये. दुबईला काही काळ नोकरी केल्यानंतर लिंगबदलासाठी आवश्यक असलेले पैसे आरवने गोळा केले आणि एका वर्षामध्ये त्याचं रुपांतर महिलेतून पुरुषात झालं. आता तर त्याला दाढी मिशा पण आल्या आहेत. सुकन्यालाही लहानपणापासून वाटत होतं की आपण पुरूष नसून महिला आहोत. मुलांमध्ये कितीही खेळलो तरी आतून मी मुलगी आहे असंच वाटायचं असं ती सांगते. त्यामुळे वयाच्या 12 वर्षांपासून ते 18 वर्षांपर्यंत तिला खूप मानसिक त्रास सोसावा लागला. अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाची समजूत घातल्यानंतर ती बेंगळूरला गेली व नोकरी करून पैसे साठवू लागली कारण शस्त्रक्रियेचा खर्च 8 ते 10 लाख रुपये होता.आता मात्र, आरव व सुकन्या दोघांच्याही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून स्त्रीचा पुरूष तर पुरुषाची महिला अधिकृतपणे झाली आहे आणि लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.(छायाचित्रं सौजन्य मिड डे)
लिंगबदलाचा शेवट गोड - महिला झालेल्या पुरूषाचं ठरलं पुरूष झालेल्या महिलेशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 2:19 PM
पुरूषाच्या शरीरामध्ये एक महिला अडकलेली होती, तर महिलेच्या शरीरामध्ये होता एक पुरूष. लिंगबदलासाठी तीन वर्षांपूर्वी दोघे मुंबईत आले असताना एकमेकांना भेटले आणि या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.
ठळक मुद्देआरव अपुकुट्टन (वय 46) याचा जन्म महिला म्हणून झाला व तिचं नाव होतं बिंदू.सुकन्या कृष्णन (वय 22) या आताच्या मुलीचा जन्म पुरूष म्हणून झाला नी त्याचं नाव होतं चंदूलिंगबदलाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आरव व सुकन्या सप्टेंबरमध्ये लग्न करणार आहेत.