गेल्या दीड वर्षात भाजपाने आपले पाच तेजस्वी हिरे गमावले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे पाच दिग्गज नेते आणि भली माणसं काळाच्या पडद्याआड गेली आहेत. सुषमा स्वराज, बाबुलाल गौर आणि अरुण जेटली यांचं निधन तर अगदी काही दिवसांच्या अंतराने झालंय. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं खूप कठीण आहे. अशा प्रसंगी एका ब्रिटीश खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वादग्रस्त ट्विट केलं आहे.
लॉर्ड नझीर अहमद हे ब्रिटीश संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्डचे आजीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले पहिले मुस्लिमधर्मीय नेते आहेत. 'भाजपा नेत्यांचं एकापाठोपाठ एक निधन होत आहे आणि आता पुढचा नंबर नरेंद्र मोदींचा आहे', अशा आशयाच्या त्यांच्या ट्विटनं एकच खळबळ उडवून दिली आहे. भाजपा खासदार प्रज्ञा सिंह यांच्या 'काळ्या जादू'च्या विधानावर टिप्पणी करताना त्यांचा तोल सुटला आहे.
'भाजपा नेत्यांवर विरोधी पक्षांनी जादूटोणा, तंत्र-मंत्र केल्याच्या दाव्यांदरम्यान गौर, सुषमा स्वराज, अटलबिहारी वाजपेयी, मनोहर पर्रिकर आणि अरुण जेटली यांचं गेल्या वर्षभरात निधन झालं. आता पुढे नरेंद्र मोदी', असं लॉर्ड नझीर अहमद यांनी म्हटलंय. त्यानंतर भारतातीलच नव्हे, तर जगभरातील नेटकऱ्यांनी अहमद यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मोदी सरकारमधील मंत्री किरण रिजीजू यांनीही नझीर अहमद यांना चपराक लगावली आहे.
'अशा प्रकारच्या ब्रिटीश बुद्धिजीवी वर्गाकडे पाहिलं की, या भूमीवर कुठले-कुठले लोक आलेत, हेच मला समजत नाही. लोकांना मॅनेज करून तुम्ही हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य झाला आहात का?', असा सडेतोड सवाल किरण रिजीजू यांनी केला आहे.
दरम्यान, माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं २४ ऑगस्ट रोजी निधन झालं होतं. तत्पूर्वी, ६ ऑगस्टला सुषमा स्वराज यांचं आकस्मिक निधन देशवासीयांना चटका लावून गेलं होतं.