विधानसभा निवडणुकीनंतर गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या TMC ने येथे 294 पैकी 213 जागा जिंकून सरकार स्थापन केले. मात्र, आता लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भगवा फडकविण्याची भाजपची इच्छा आहे. या दौऱ्यात अमित शहा येथे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, ते मैत्री संग्रहालयाची पायाभरणी आणि हरिदासपूर येथील एका संमेलनातही सहभागी होतील.
पश्चिम बंगालमधील भाजपाध्यक्ष सुकांता मजूमदार यांनी बुधवारीच यासंदर्भात माहिती दिली होती. ते म्हणाले, अमित शाह सकाळी सर्वप्रथम नॉर्थ 24 परगानच्या बीएसएफ कॅम्पला भेट देतील. शुक्रवारी ते भारत-बांगलादेश सीमावरती भागाचा दौरा करतील. ते तेथे बीएसएफच्या जवानांशी संवादही साधतील. यानंतर ते कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेरोरियल हॉलमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होतील. तसेच यादरम्यान ते भाजप मुख्यालयात पदाधिकाऱ्यांसोबतही संवाद साधतील.
याशिवाय, अमित शाह सिलीगुडी येथे गोरखा गिर्यारोहक तेनसिंग नोर्गे आणि कूचबिहार नेते राजबंशी यांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करतील. तसेल ते एका जनसभेलाही संबोधित करणार आहेत, असे राज्यातील एका वरिष्ठ भाजप नेत्याने म्हटले आहे.
पोट निवडणुकीतील पराभवानंतर परिवर्तनाची इच्छा -गृहमंत्री शाह यांचा हा दौरा पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपला येथे मोठा धक्का बसला आहे. येथे टीएमसीने दोन्ही जागा जिंकल्या. यानंतर भाजपला संघटनेत बदलाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे, अमित शहा यांचा हा दौरा संपल्यानंतर पश्चिम बंगाल भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.