लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आता सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. निवडणूक निकालानंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर लवकरच ते यूपीमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावाही करू शकतात.
राज्यपालांची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कार्यकाळातील अखेरची कॅबिनेट बैठकही घेतली. यानंतर ते थेट राजभवनाकडे रवाना झाले.
भाजप युतीला पूर्ण बहुमत -उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजप युतीने 273 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहर विधानसभा मतदार संघात एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा कौशांबी जिल्ह्यातील सिराथू मतदारसंघात सात हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.
या निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या सपाने 111 जागा जिंकल्या आहेत. सपाचा मित्रपक्ष असलेल्या आरएलडीने आठ तर सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने सहा जागा जिंकल्या आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार प्रोफेसर एसपी सिंह बघेल यांचा 67 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.