लेह : पँगाँग तलावावर अवैध पुलाचे बांधकाम करणाऱ्या चीनची आणखी एक कुरापत समाेर आली आहे. चीनने चुशुलच्या सीमेजवळ माेबाइल टाॅवर लावले आहेत. याबाबतची छायाचित्रे स्थानिक नगरसेवकाने पाेस्ट केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही बांधकामे चीनने १९६२ पासून अवैधरीत्या ताब्यात घेतलेल्या भागात झालेली आहेत. लडाखच्या स्वायत्त पहाडी विकास परिषदेचे चुशुल येथील नगरसेवक काेंचाेक स्टँझिन यांनी माेबाइल टाॅवरची छायाचित्रे ट्विटरवर पाेस्ट केली आहेत. त्यात त्यांनी लिहिले आहे, की पँगाँग तलावावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीनने आता भारतीय हद्दीच्या अतिशय जवळ ३ माेबाइल टाॅवर्स उभारले आहेत. हा चिंतेचा विषय नाही का? आमच्या कडे गावात ४ जी सुविधा नाही. माझ्या मतदारसंघातील ११ गावांमध्ये ४ जी सेवा नाही. चीनने सीमेजवळ माेठ्या प्रमाणावर बांधकाम आणि पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. लष्करी हालचाली वेगाने करता याव्यात, यासाठी चीनने रस्ते व रेल्वेचे जाळे विणले आहे
लोकसभेतही माहितीचुशुल पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडे असून, प्रत्यक्ष ताबा रेषा गावापासून ८ किलाेमीटर अंतरावर पूर्वेकडे आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी फेब्रुवारीमध्ये चीनच्या अवैध बांधकामांबाबत लाेकसभेमध्ये माहिती दिली हाेती. चीनने बेकायदा ताबा घेतलेल्या भूभागामध्ये पुलाचे बांधकाम केल्याचे त्यांनी म्हटले हाेते, तर दाेन दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही चीनला कठाेर शब्दांमध्ये सुनावले हाेते.