नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात काँग्रेसला हातात असलेले पंजाब हे राज्य गमवावे लागले. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये सत्ता मिळवण्याची संधी गमवावी लागली. उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसला ४०३ पैकी केवळ २ जागांवर यश मिळाले. या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आक्रमक झाल्या असून, त्यांनी .या पराभवाची समीक्षा करत मोठा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह इतर चार राज्यातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामे द्यावे लागणार आहेत.
पाच राज्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी अगदी सुमार झाली होती. पंजाबमध्ये आपच्या लाटेमध्ये काँग्रेसचा सफाया झाला. तिथे पक्षाला केवळ १८ जागा मिळाल्या. तर उत्तराखंडमध्येही काँग्रेसला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले. गोव्यात काँग्रेसला ११ तर उत्तर प्रदेशमध्ये केवळ २ आणि मणिपूरमध्ये पाच जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले.