नवी दिल्ली- बिहारमधील लखीसराय येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यविधीसाठी दोन मुलांमध्ये भांडण झाले. त्यानंतर हा सर्व प्रकार पोलीस स्थानकापर्यंत पोहचला.
सदर मृत्यू झालेल्या महिलेला दोन मुले आणि एक मुलगी अशी आपत्य होती. पहिला मुलगा मुस्लिम तर धाकटा मुलगा आणि मुलगी हिंदू धर्माची होती. सदर महिला मुस्लिम होती. त्यानंतर तिने धर्म बदलून रायका खातूनवरुन रेखा देवी झाली. रेखा देवी लग्नानंतर गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पतीच्या गावी राहत होत्या. तिचा मोठा मुलगा (मुस्लिम) तिच्यापासून वेगळा राहत होता.
सदर महिलेचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा तिच्या अंत्यसंस्कारावरुन मुलांमध्ये वाद सुरू झाला. मोठ्या मुलाला आईचा अंतिम संस्कार मुस्लिम रितीनुसार करायचा होता, तर लहान मुलाला हिंदू रितीनुसार करायचा होता. दोन्ही मुलांमध्ये अंत्यसंस्कार करण्यावरून वाढत चाललेला वाद पाहून लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. एसपी इम्रान मसूद आणि चानन पोलिस स्टेशनचे प्रमुख रुबिकांत कछाप हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही भावांमधील वाद मिटवला. यानंतर संपूर्ण गावातील लोकांनी एएसपी इम्रान मसूद यांचे कौतुक केले.
सदर प्रकरणावर काय म्हणाले एसपी?
एसपी म्हणाले, 'आम्हाला माहिती मिळाली होती की ८०-९० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांना दोन मुलं असून दोघेही भिन्न धर्माचे आहेत. एक मुस्लिम धर्म पाळतो आणि दुसरा हिंदू धर्म पाळतो. महिलेचे दोनदा लग्न झाले होते, तिचा पहिला पती मुस्लिम होता तर दुसरा पती हिंदू होता. महिला देखील मुस्लिम होती. पण तिने ४० वर्षांपूर्वी तिचे नाव बदलले आणि गावात रेखा देवी या नावाने ओळखली जात होती. गावातील लोक त्यांना पंडिताई नावाने ओळखत होते आणि त्यांची जीवनशैलीही हिंदू धर्मानुसार होती.
मृत्यूनंतर आईचे अंतिम संस्कार कसे करायचे यावरून दोन मुलांमध्ये वाद झाला. दोन्ही मुलांना समजावून सांगून वाद मिटवला. महिलेचा मृतदेह तिचा लहान मुलगा बबलू झा याच्या ताब्यात देण्यात आला. एसपी सय्यद इम्रान मसूद आणि चानन पोलिस स्टेशनचे अध्यक्ष रुबी कांत कश्यप यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि बबलू झा यांना त्याच्या आईचे अंतिम संस्कार करण्यास परवानगी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"