सिहोर : मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात वडिलांच्या निधनानंतर दोन मुलींनी स्मशानभूमीत जाऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यांनी वृद्ध वडिलांसाठी सनातनी परंपरा मोडून काढली आणि संपूर्ण विधी करून मुखाग्नी दिली. स्मशानभूमीत उपस्थित पंडितांनी या मुलींना अंत्यसंस्काराची माहिती देखील दिली. हे दृश्य पाहून गावकऱ्यांनीही मुलींना धीर दिला. सर्वच क्षेत्रात मुली पुढे असताना त्यांना या कामात का अडवले जाते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, 85 वर्षीय नन्नूलाल यादव हे सिहोर येथील पांगुराडिया गावचे रहिवासी होते. तसेच ते एक माजी सैनिक देखील होते. अधिक चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांना सेवा पदकही मिळाले. गावातील प्रत्येकाशी ते कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागायचे. अनेकवेळा तरुण त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. मात्र, त्यांचे अकस्मात निधन झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. मुलींनी दिली मुखाग्नी 85 वर्षीय नन्नूलाल यादव हे पत्नी कमला यादव यांच्यासोबत गावात राहत होते. खरं तर त्यांना एकही मुलगा नाही. अशा स्थितीत मुलींनी मुलाची जबाबदारी पार पाडण्याचे ठरवले. त्यांची मोठी मुलगी राखी यादव आणि धाकटी मुलगी दिव्या यादव यांनी चितेला अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. मुली स्मशानभूमीत पोहोचल्या आणि अंतिम संस्कारासाठी सर्व विधी पूर्ण केला आणि मुखाग्नी दिली.
गावावर शोककळा नन्नूलाल यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. त्यांच्या घराबाहेर हळूहळू लोक जमू लागले. काही वेळात शेकडो लोक जमा झाले. माजी सैनिकाच्या अंत्यदर्शनासाठी लोक मोठ्या संख्येने आले होते. यादरम्यान, अनेकांनी त्यांच्याशी असलेली जवळीक आणि त्याच्या वागण्याबद्दल भाष्य केले. त्यांच्या देशसेवेचेही अनेकांनी स्मरण केले. यानंतर नन्नूलाल यादव यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेसह शेकडो लोकांनी स्मशानभूमीत जाऊन त्यांना अंतिम निरोप दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"