नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व काढून घेतल्यानंतर आज पहिल्यांदा गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. अदानी-मोदी संबंधांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला घेरले. तसेच 'पंतप्रधान माझ्या भाषणाला घाबरतात म्हणून मला अपात्र ठरवण्यात आले. ते माझ्या पुढच्या भाषणाला घाबरत होते, ते भाषण अदानी यांच्यावर होते, असा आरोपही राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केला.
'मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं, माझ्या पुढच्या भाषणाबद्दल ते घाबरले होते. संसदेतील माझे पुढचे भाषण त्यांना नको होते. भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी अनेकदा सांगितले आहे. याबाबत रोज नवनवीन उदाहरणे मिळतात. मी त्यांना एकच प्रश्न विचारला होता. 'अदानीजींच्या शेज कंपन्या आहेत, त्यात कोणीतरी २०,००० कोटी रुपये गुंतवले आहेत. यात अदानींचा पैसा नाही. हा त्यांचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय आहे, पैसा दुसऱ्याचा आहे. हे २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? प्रश्न असा आहे. यात एक चिनी सामील आहे, कोणी प्रश्न का विचारत नाही? मी संसदेत पुरावे देऊन अदानी आणि मोदी यांच्यातील संबंधांबद्दल बोललो, जे मी मीडिया रिपोर्ट्समधून काढले होते. यानंतर राहुल गांधी यांनी लंडनमधील वक्तव्यावरून झालेल्या वादावर भाजपवर जोरदार प्रहार केले.
राहुल गांधी म्हणाले की, मी परकीय सैन्याची मदत घेतली, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. हे संपूर्ण नाटक पीएम मोदींना वाचवण्यासाठी रचण्यात आले आहे. या लोकांना अजून समजले नाही, मी तुरुंगात जाण्यास घाबरणार नाही, असंही गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, मोदी आणि अदानी यांचे नाते नवीन नाही, जुने आहे. नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचे नाते आहे. मी विमानाचा फोटो दाखवला. नरेंद्र मोदीजी त्यांच्या मित्रासोबत अगदी आरामात बसले होते. मी संसदेत फोटो दाखवला. त्यानंतर माझे भाषण काढले, असंही राहुल गांधी म्हणाले. मी अध्यक्षांना तपशीलवार पत्र लिहिले. मी म्हणालो की नियम बदलले आणि विमानतळ अदानीजींना देण्यात आले पण काही फरक पडला नाही. माझ्याबद्दल मंत्र्यांनी संसदेत खोटे बोलले. मी परकीय सैन्याची मदत मागितली होती, असा मंत्र्यांनी आरोप केला. मी असं काहीही केलेले नाही, असंही गांधी म्हणाले.
मी सभापतींना सांगितले की, साहेब, संसदेचा नियम आहे की कोणत्याही सदस्यावर आरोप झाले तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार आहे. मी एक पत्र लिहिले पण उत्तर मिळाले नाही, दुसरे पत्र लिहिले आणि उत्तर मिळाले नाही. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जाऊन म्हणालो की, साहेब कायदा आहे, तुम्ही मला बोलू का देत नाही. सभापती महोदय हसले आणि म्हणाले की, मी काही करू शकत नाही. त्यानंतर काय झाले, ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे, मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.