उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसच्या 3 बड्या नेत्यांनी एकाच दिवसात पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये (AAP) प्रवेश केला आहे. राजेंद्र प्रसाद रातुडी, कमलेश रमण आणि कुलदीप चौधरी यांनी सोमवारी काँग्रेसच्या (Congress) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजेंद्र प्रसाद रतुडी हे उत्तराखंड काँग्रेसचे प्रवक्ता होते, कुलदीप चौधरी हे पक्षाचे सोशल मीडिया सल्लागार होते, तर कमलेश रमन हे प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष होते, या तिघांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला.
उत्तराखंड काँग्रेसला एकाच दिवसात तीन मोठे धक्के बसल्यानंतर, काँग्रेस नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत (Harak Singh Rawat) यांच्या घरी पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर चर्चा झाली. याच बरोबर, मनीष सिसोदिया यांनी काँग्रेसच्या या तीनही नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून, या तीनही नेत्यांमुळे राज्यात पक्षाची शक्ती वाढेल, असे सिसोदिया यांनी म्हटल्याचे, उत्तराखंड आप संयोजक जोत सिंह बिष्ट यांनी म्हटले आहे.
...म्हणून दिला काँग्रेसचा राजीनामा - AAP नेते जोतसिंग बिष्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड कॉंग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रतुडी, राज्य महिला कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश रमण आणि पक्षाचे सोशल मीडिया सल्लागार कुलदीप चौधरी यांनी 2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होऊनही, वाढत असलेल्या पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे.हरकसिंह रावत यांच्या घरी बैठक - दुसरीकडे, एकाच दिवसात काँग्रेसच्या 3 नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक बोलावली होती. माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते हरकसिंह रावत यांच्या घरी ही बैठक झाली. यावेळी पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस हरीश रावत उपस्थित नव्हते.