इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष पेटल्यानंतर आता, भारत सरकारने अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारताने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, इस्रायलच्या स्थानिक अधिकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्लाही भारत सरकारने दिला आहे.
महत्वाचे म्हणजे, अनावश्यक हलचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला आहे.
इस्रायलच्या लोकांना घरातच राहण्याचे आदेश -सीएएनएनच्या वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक भागांत सायरन वाजले. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेल अवीवमध्ये संरक्षण दलाच्या मुख्यालयात सुरक्षेसंदर्भात मूल्यमापन करत आहेत. या शिवाय, इस्रायलने आपल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत.
आम्ही इस्रायलच्या पाठीशी - अमेरिका -हमासच्या या हल्ल्याविरोधात इस्रायलने 'ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स'ची घोषणा केली आहे. हमासने गंभीर चूक केल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. दक्षिण इस्रायलमध्ये 21 ठिकाणी हमासच्या घुसखोर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. या सर्व घडामोडी पाहून अमेरिकेने आपण इस्रायलसोबत उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. इस्रायलमधील हमास हल्ल्याचे जे फोटो, व्हिडीओ येत आहेत. यामध्ये मृत आणि जखमी झालेल्या लोकांना पाहून विचलित होत आहे. या घटनेत आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असे अमेरिकेच्या यूएस चार्ज अफेयर्सने म्हटले आहे.
तत्पूर्वी, आपण इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट हल्ले केले असल्याचे हमासने म्हटले आहे. एवढेच नाही, तर आपण इस्रायली कब्जाच्या विरोधात "ऑपरेशन अल-अक्सा फ्लड" सुरू केले आहे, अशी घोषणाही हमासने केली आहे. यानंतर, आपणही युद्धासाठी तयार आहोत, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. लष्कराने आपल्या सैन्यासाठी 'रेडिनेस फॉर वॉर'चा अलर्टदेखील जारी केला आहे. तसेच, गजामध्ये शिक्षण मंत्रालयाने आज सर्व शाळांना सुट्टी दिली आहे.