केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या रोहिंग्या (Rohingya) शरणार्थींना वसविण्यासंदर्भातील वक्तव्याने मोठी खळबळ उडाली होती. आता, यासंदर्भात खुद्द गृहमंत्रालयानेच स्पष्टिकरण दिले आहे. रोहिंग्या शरणार्थी डिटेन्शन सेंटर्समध्येच राहणार, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी, रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील EWS फ्लॅट्समध्ये स्थलांतरित करण्यात येईल, असे हरदीप पुरी यांनी म्हटले होते.
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात गृह मंत्रालयाने (MHA) म्हटले आहे, की मंत्रालयाने बेकायदेशीर स्थलांतरित रोहिंग्यांना नवी दिल्लीतील बक्करवाला (Bakkarwala) येथील EWS फ्लॅटमध्ये ठेवण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाहीत. तसेच, दिल्ली सरकारने रोहिंग्यांना नव्या लोकेशनवर हलविण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर, रोहिंग्यांना सध्याचे लोकेशन कंचन कुंज (मदनपूर खादर) येथेच ठेवण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत, असे सांगण्यात येत आहे.
एवढेच नाही, तर सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, अवैध परदेशी निर्वासितांना त्यांच्या देशात पाठवेपर्यंत डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवण्यात येईल. मात्र, दिल्ली सरकारने अद्याप सध्याचे लोकेशन डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित केलेले नाही. त्यांनी ते तत्काळ डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
काय म्हणाले होते हरदीप सिंग पुरी?"भारत आश्रय मागणाऱ्या लोकांचे नेहमीच स्वागत करतो. एक ऐतिहासिक निर्णय घेत सर्व रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील बक्करवाला भागातील EWS फ्लॅट्समध्ये शिफ्ट करण्या येईल. त्यांना मूलभूत सुविधा, UNHRC आयडी आणि 24 तास दिल्ली पोलिसांचे संरक्षण देण्यात येईल," अशा आशयाचे ट्विट हरदीप सिंग पुरी यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली होती.