पाटणा - कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकते, असे संकेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी येथे दिले. या बैठकीत विरोधी ऐक्य घडवून आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
‘आम्ही नक्कीच एकत्र बसू आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची एकी घडवून आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा करू,’ असे नितीश म्हणाले. सध्या काही नेते (कर्नाटक) विधानसभा निवडणुकीत व्यग्र आहेत. निवडणूक आटोपल्यानंतर आम्ही बैठकीचे ठिकाण निश्चित करू. विरोधी पक्षनेत्यांच्या पुढील बैठकीसाठी एकमताने पाटणा हे ठिकाण निवडले गेले तर ही बैठक येथेच होईल. ही बैठक आयोजित करताना आम्हाला आनंद होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी २४ एप्रिल रोजी कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. यावेळी बॅनर्जी यांनी नितीश यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी ऐक्याबाबत चर्चा करण्यासाठी पाटणा येथे सर्व बिगर भाजप पक्षांची बैठक आयोजित करण्याचे आवाहन केले होते.
नितीशकुमार लालूंना भेटलेराष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव पाटण्यात परतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध देशव्यापी विरोधी आघाडी उभारण्यासाठी उभय नेते संयुक्तरीत्या काम करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली.