Assam Rape Case : कोलकाता आणि बदलापूरच्या अत्याचार प्रकरणांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. अशातच आसामध्येही मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीय. ट्यूशनवरुन घरी परतत असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक अत्याचार करण्यात आला. बलात्कारानंतर आरोपींनी पीडित मुलीला शेताजवळ सोडून दिलं. आता त्याच पीडितेच्या एक गोष्टींने लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अत्याचाराची घटना होण्याआधीच पीडितेने तिच्या कुटुंबियांनी देशभरात सुरु असलेल्या अत्याचारांच्या घटनांबाबत विचारलं होतं. दोनच दिवसांनी पीडितेवर असा प्रसंग ओढावला की त्यामुळे तिला मोठा धक्का बसला.
आसाममधील नागाव जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली. या प्रकरणात आता रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीने घटनेच्या दोन दिवस आधी तिच्या मावशीला बलात्कार म्हणजे काय असे विचारले होते. पीडितेच्या एका महिला नातेवाईकाने सांगितले की, कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे पीडित मुलगी खूप व्यथित झाली आहे. या घटनेची बातमी वाचल्यानंतर तिने काकीला या घटनेबद्दल विचारलं होतं. या घटनेचा अल्पवयीन मुलीच्या मनावर खोलवर परिणाम झालाय असं वाटत होतं असं पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले.
"कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर देशातील महिला सुरक्षेवर झालेल्या चर्चेदरम्यान पीडितेने या विषयांवरील लेख वाचले होते. उत्सुकतेपोटी, “बलात्कार म्हणजे काय?” असेही विचारले होते. तिच्यासोबत इतकी भयंकर घटना घडेल असे मला वाटले नव्हते. मी तिला वाचवू शकले नाही," असे पीडितेच्या मावशीने म्हटलं.
पीडिता आजी-आजोबा, काका-काकूंसोबत राहत होती. लहानपणीच तिची आई वारली होती. तर वडील गुवाहाटी येथे काम करतात. पीडिता सहसा ट्यूशनवरून तिच्या मावशीसोबत किंवा रिक्षातून घरी परतत असे. घटनेच्या दिवशी ती सायकलने परतत होती. ट्यूशनमधून घरी परतत असताना तिच्या घरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्थानिकांना ती भाताच्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळला होती. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पीडितेला शिक्षण घेऊन खूप पुढे जायची होती. पोलीस दलात अधिक्षक पदापर्यंत पोहोचण्याचे तिचे स्वप्न होते. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता महिला पोलीस अधिक्षक तिला भेटण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा पीडितेने त्यांच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला होता.