यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून एनडीएला बहुमत मिळालं होतं. मात्र भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट होऊन पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. दरम्यान, लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्येही भाजपा आणि एनडीएचं संख्याबळ घटलं आहे. राज्यसभेमधील भाजपाचे चार नामनिर्देशित खासदार शनिवारी निवृत्त झाले. त्याबरोबरच वरिष्ठ सभागृहात भाजपाचं संख्याबळ घटून ८६ वर तर एनडीएचं संख्याबळ १०१ पर्यंत खाली आलं. दरम्यान, १९ जागा रिक्त झाल्याने सद्यस्थितीत राज्यसभेतील खासदारांची संख्या २२६ एवढी झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेमध्ये कामकाज चालवताना सत्ताधारी भाजपासमोरील अडचणी वाढणार का? संख्याबळ कमी झाल्याने एनडीएचं नुकसान होणार का? प्रमुख कायदे पारित करण्यासाठी एनडीएकडे पुरेसं संख्याबळ आहे की नाही, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
मात्र संख्याबळ घटलं असलं तरी राज्यसभेमध्ये भाजपा अजूनही भक्कम स्थितीत आहे. तसेच सभागृहातील नंबर गेममध्येही अजूनही भाजपा पुढे आहे. एनडीएकडे अजूनही सात बिगरराजकीय नियुक्त सदस्य, २ अपक्ष आणि एआएडीएमके आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महत्त्वाची विधेयके आणि कायदे मंजूर करून घेण्याइतपत संख्याबळ एनडीएकडे आहे. मात्र इतर पक्षांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भाजपाला नियुक्त सदस्यांची पदं लवकरात लवकर भरावी लागतील.
सध्या राज्यसभेमधील राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंह आणि महेश जेठमलानी हे चार नियुक्त सदस्य निवृत्त झाले आहेत. राज्यसभेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर या चारही सदस्यांनी भाजपाचं सदस्यत्व घेतलं होतं. नियुक्त खासदारांमधील आणखी एक सदस्य गुलाम अली हे आहेत. ते २०२८ मध्ये निवृत्त होतील. सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्यांची नियुक्ती करतात. सध्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या सदस्यांपैकी ७ सदस्यांनी स्वत:ला पक्षीय राजकारणापासून दूर ठेवलं आहे. मात्र सभागृहात कायदे पारित करताना ते सरकारला साथ देतात.
सध्याच्या काळात राज्यसभेमध्ये १९ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये जम्मू-काश्मीर आणि राष्ट्रपतींकडून नियुक्त होणाऱ्या प्रत्येकी ४ आणि आठ वेगवेगळ्या राज्यांमधील ११ जागा रिक्त झालेल्या आहेत. या ११ जागांपैकी १० जागा ह्या लोकसभा निवडणुकीमुळे रिक्त झाल्या आहेत. तर बीआरएसचे खासदार केशव राव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. आता येणाऱ्या काळात ११ जागांवर होणाऱ्या निवडणुकीमध्ये एनडीएला ८ जागा तर इंडिया आघाडीला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला तेलंगाणामध्ये १ जागा मिळेल. त्यामुळे त्यांची सदस्यसंख्या २७ पर्यंत पोहोचेल. मात्र भाजपाला राज्यसभेमध्ये महत्त्वाची विधेयकं पारित करण्यासाठी भाजपाला अडचणी येण्याची शक्यता फार कमी आहेत.