Rajya Sabha Seats : 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष राज्यसभा निवडणुकांवर लागले आहे. राज्यसभेचे 10 खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. राज्यसभा सचिवालयाने सांगितल्यानुसार, यात आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन जागा, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरामधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
यावेळी लोकसभा निवडणूक जिंकून 10 राज्यसभा खासदार लोकसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे वरिष्ठ सभागृहातील या सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोग आता राज्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी निवडणुकांच्या नवीन तारखा जाहीर करेल.
कोणाच्या रिक्त झाल्या?आसामचे कामाख्या प्रसाद तासा आणि सर्बानंद सोनोवाल, बिहारचे मीसा भारती आणि विवेक ठाकूर, हरियाणाचे दीपेंद्र सिंह हुड्डा आणि मध्य प्रदेशचे ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्रातील उदयनराजे भोसले आणि पीयुष गोयल, राजस्थानचे केसी वेणुगोपाल आणि त्रिपुराचे बिप्लब कुमार देब यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत.
राज्यसभेच्या जागा कोणाकडे असतील?आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे. आसाममधील दोन्ही जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे आणि पक्षाने राज्यात 14 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत. बिहारमध्येही हीच परिस्थिती आहे. राजदला येथे नुकसान सहन करावे लागू शकते. मात्र, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये निकराची लढत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हरियाणा, मध्य प्रदेश आणि त्रिपुरामध्ये भाजप राज्यसभेच्या जागा सहज काबीज करू शकते.